नाशिक (प्रतिनिधी) :- पंचवटी परिसरातील हनुमानवाडी येथे घराबाहेर उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या मागील व पुढील बाजूच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी निवृत्ती तुकाराम मौले (रा. हनुमानवाडी) हे राजदर्शन इमारतीत राहतात. काल रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ टाटा मॅजिक व बोलेरो अशी तीन वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. मध्यरात्री कधी तरी अज्ञात समाजकंटकांनी या दोन वाहनांसह आणखी एका कारची काच फोडली.
ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर मौले यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली असून, त्यानुसार अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करीत आहेत. दरम्यान, वाहनांची काच फोडून दहशत निर्माण करणार्या समाजकंटकांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.