लखनौ: तस्करी करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याला काही मर्यादा नाही. सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा ड्रग्सची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध युक्त्या लढवतात. असाच एक तस्करीचा प्रकार लखनौ विमानतळावर उघडकीस आला.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी एका प्रवाशाकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 291 ग्रॅम सोने जप्त केले. या तस्कराने आपल्या डोक्यावरील विगमध्ये हे सोने लपवले होते.
शारजाहून लखनौ विमानतळावर पोहोचलेल्या एका प्रवाशाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तापसणीवेळी हा प्रवासी संशयित हालचाली करत होता. अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याने विग घातल्याचे आढळले. त्याचा विग काढला असता, त्यात सोने लपवल्याचे आढळले.
विगमध्ये एका काळ्या पिशवीत 15 लाख 42 हजार रुपये किमतीचे 291 ग्रॅम सोने ठेवले होते. जप्त केलेले सोने सीमाशुल्क कायद्याच्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. कस्टम कायद्याच्या कलम 104 अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.