नाशिक :- नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकहून या महिन्याअखेरीस नवी दिल्ली व हैदराबाद सोबत आणखी दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
स्पाइसजेट कंपनी या नवीन शहरांना ही सेवा देणार आहे. हैदराबाद व नवी दिल्ली नंतर आता नाशिकहून पॉण्डीचेरी आणि तिरुपती येथेही विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती नाशिक एव्हिएशनचे मुख्य समन्वयक मनीष रावल यांनी दिली. यामुळे आता नाशिकहून तिरुपती फक्त 6 तासांत आणि पोंडीचेरी येथे केवळ 5 तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. स्पाईस जेटने त्याचे तिकीट बुकींग सुरू केले आहे.
यामुळे उद्योजक, व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नाशिक – हैदराबाद विमानसेवा २२ जुलै तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. नाशिक-हैदराबाद, नाशिक-दिल्ली, नाशिक-पॉण्डीचेरी व नाशिक-तिरुपती ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू असणार आहे.
अशा आहेत विमानांच्या वेळा
हैदराबाद – नाशिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी 6.20 वाजता निघणार असून 7.50 वाजता नाशिकला पोहोचेल. नंतर तेच विमान पुन्हा सकाळी 8.10 वाजता नाशिकहून निघेल व स.9.40 वाजता हैदराबाद ला पोहोचेल.
दिल्ली-नाशिक हे विमान सायंकाळी 17.00 मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून सायंकाळी 18.50 वाजता नाशिकला पोहोचेल तर तेच विमान नाशिकहून पुन्हा सायंकाळी 19.20 वाजता निघून 21.20 वाजता दिल्लीत पोहोचेल.
पॉण्डीचेरी आणि तिरुपती या दोन्ही शहरांसाठी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान निघेल तर पॉण्डीचेरी येथे 13.10 व तिरुपती येथे 14.05 वाजता विमान पोहोचेल.
सद्यस्थितीत नाशिकहून सुरू असलेल्या सेवा
नाशिक-अहमदाबाद
नाशिक-अहमदाबाद
नाशिक-पुणे
नाशिक-दिल्ली (व्हाया अहमदाबाद)