नाशिक ( प्रतिनिधी) :– सर्वसामान्यांना लागणार्या नॉनब्रँडेड वस्तूंवर केंद्र शासनाने 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे संतप्त असलेल्या व्यापार्यांनी आज पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

जीएसटी कौन्सिलने सोमवार दि. 18 जुलैपासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाच टक्के जीएसटी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये धान्य व किराणा बरोबरच प्रिंटिंग व इतर काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. याचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. 12% वरून हा जीएसटी 18 टक्क्यांवर करण्यात आला आहे.
या जीएसटी वाढीला व्यापारी महासंघाच्या वतीने तसेच विविध व्यापारी संघटनेच्या वतीने विरोध करणे सुरू झाले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सर्व व्यापारी संघटनांनी देशभर दुकान बंद ठेवण्याच्या आंदोलनाला नाशिक शहर आणि जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला शहरातील बहुतांशी मोठ्या व्यापार्यांनी आपली दुकाने दुकाने बंद ठेऊन जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाला तीव्र विरोध केला.
या वस्तूंवर जीएसटी
डब्यात किंवा पॅक केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर धान्ये, डाळी आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% बँकेकडून टेट्रा पॅक आणि चेक जारी करण्याच्या सेवेवर 18 टक्के , विविध नकाशे आणि तक्त्यांवर 12 टक्के जीएसटी, प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने चाकू, पेपर-कटिंग नाइफ या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी, सोलर वॉटर हीटर्स, एलईडी दिवे, दिवे यांनाही आता 12 ऐवजी 18 टक्के जीएसटी लागणार आहे.
केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा, मोठे आंदोलन करू : संचेती
नाशिक धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलने पाच टक्के वाढीचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे यामुळे सर्वसामान्य जनता अजून महागाई मध्ये भरडली जाणार आहे. त्याचबरोबर व्यापार्यांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की या निर्णयावरती अर्थ मंत्रालय आणि जीएसटी कौन्सिलने पुनर्विचार करावा जर पुनर्विचार झाला नाही तर भविष्यामध्ये व्यापारी मोठ्याप्रमाणात असहकार आंदोलन करतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ब्रँडेड वस्तूंवर जीएसटी लागू करताना नॉनबँ्रडेड वस्तूंवर हा कर लादणार नाही, असे त्यावेळी केंद्र शासनाने आश्वासन दिले होते. परंतु आता दही, दूध, ताक, मुरमुरे, सर्वप्रकारचे धान्य, दाळी, गुळ, पोहे अशा सर्वमान्यांना लागणार्या खाद्य पदार्थांवर सोमवारपासून जीएसटी लागणार आहे आणि याचा बोजा सामान्य जनतेवरच पडणार असल्यामुळे देशभरातील सर्व होलसेल आणि किरकोळ व्यापार्यांनी आज बंद पाळला आहे. त्यास संपूर्ण प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रफुल्ल संचेती यांनी दिली.