नाशिक ( प्रतिनिधी) :- सातपूर, अंबड व अन्य भागांत तब्बल 24 ठिकाणी चोर्या करणार्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारांसह पकडून अंबड पोलिसांनी सुमारे 28 तोळे सोने जप्त केले आहे. त्याची किंमत बाजारामध्ये वीस लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.
या टोळीने जिल्ह्यात व राज्यातील अन्य काही शहरांत चोर्या व घरफोड्या केल्या आहेत काय, याचीही चौकशी सुरू असल्याचे आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.
नाशिक शहर आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरी होण्याच्या घटना या वाढत होत्या. या घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले होते. त्यातच विभाग 2 मधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्मचार्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी परभणी व उस्मानाबाद या परिसरासह राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये फरारी असलेला गुन्हेगार अभिषेक उदय विश्वकर्मा, त्याचे साथीदार ऋषिकेश अशोक राजगिरे, करण कडूसकर यांना संशयावरून ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली. प्रथमत: या तिन्ही आरोपींनी काहीही सांगण्यास नकार दिला; परंतु पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखविताच या आरोपींनी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली.
सातपूर व अंबड परिसरामध्ये त्यांनी 24 गुन्हे केले आहेत. त्यामध्ये पोलिसांना सुमारे वीस लाख रुपयांचा ऐवज मिळून आला आहे. त्यात 28 तोळे सोने, लॅपटॉप, दोन मोटारसायकली व ओमनी कार यांचा समावेश असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की आरोपीने राज्यातील इतर भागांमध्ये काही गुन्हे केले आहेत का, याची देखील माहिती गोळा केली जात आहे अंबड पोलिसांनी केलेली ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ व सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नंदन बगाडे, श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस कर्मचारी पानसरे, गायकवाड, पवन परदेशी, आहेर, वाघचौरे, जनार्दन ढाकणे, भुरे, सानप, राकेश राऊत, योगेश शिरसाठ, प्रशांत नागरे, मोतीराम वाघ, सोनवणे व दिनेश नेहे यांनी ही कामगिरी बजावली आहे.