नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर गुन्हा दाखल

गंगापूर : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मुलीला नातवाने पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करत आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातवाने आमची मुलगी पळवून नेल्याचा आरोप केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या वृद्ध महिलेला आपल्यासोबत गंगापूर फाट्यावरून, आरोपींनी आपल्या वस्तीवर नेले. वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपींनी तिला मारहाण करायला सुरुवात केली.

संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. नातवाने मुलीला पळवून नेले म्हणून, वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्या महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओही तयार करून तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा केला. त्यामुळे अखेर या सगळ्या प्रकरणाची दखल घेत गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!