मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

नवी दिल्ली :- जगभरात कोरोना प्रादुर्भावापाठोपाठ आता मंकीपॉक्सने डोके वर काढले आहे. अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे.

तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

“ही” आहेत मार्गदर्शक तत्वे

-गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

-या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.

-रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.

-रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.

-गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.

-जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!