नाशिक (प्रतिनिधी) :– अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून एक लाख 40 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने मागील आठवड्यापासून ही केलेली चौथी कारवाई आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून ही कारवाई यापुढेही अधिक गतिमान करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त (अन्न) गणेश परळीकर यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन नाशिक या कार्यालयाने गुटका प्रतिबंधित अन्न पदार्थ तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थाविरुध्द कारवाई सुरु केलेली असुन काल अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने यांनी विल्होळी या ठिकाणी भावनाथ गल्लीत शिवाजी रघुनाथ भावनाथ यांच्या राहत्या घरी धाड टाकली.

यावेळी तपासणी केली असता त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका, पान मसाला व सुगंधित तंबाखुचा १५ प्रकारचा साठा विक्रीसाठी आढळून आला. त्याची किमत रुपये १ लाख ४३ हजार आठशे सव्ववीस इतकी आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांनी या प्रकरणी संपुर्ण साठा विक्रेता व मालक शिवाजी रघुनाथ भावनाथ यांच्याकडुन जप्त केला.
या प्रकरणी जप्त केलेला साठा हा कोणाच्या मालकीचा असुन तसेच याचा मुख्य सुत्रधार शोधण्यासाठी व या प्रकरणी उत्पादकापर्यंत तपास करण्याकरता भा.दं.वी. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ अंतर्गत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही सह आयुक्त (अन्न) गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार, योगेश देशमुख व वाहन चालक निवृत्ती साबळे यांनी केली. यापुढेही अश्या प्रकारची कारवाई ही नाशिक तालुक्यात चालु राहील. असे सहआयुक्त (अन्न) गणेश परळीकर यांनी सांगितले.