नाशिक (प्रतिनिधी) :- तुला मुलबाळ होत नाही, तसेच माहेरहून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ करणार्या पतीसह सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विवाहिता हिचे माहेर नाशिक येथे असून, तिचा विवाह श्रीरामपूर येथील खान कुटुंबियांत झाला होता. दरम्यान 3 मे 2015 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत श्रीरामपूर येथील मिल्लतनगर रो हाऊस येथे सासरी नांदत होती. त्या दरम्यान पती सद्दाम अस्लम खान, सासू समिना अस्लम खान, सासरे अस्लम मन्सूर खान, दीर फईम अस्लम खान, जेबा खान, कामरान खान, फलक खान (सर्व रा. फातिमा हौ.सोसा. मिल्लतनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) तसेच नणंद शबनम जाबीर शेख, नंदाई जाबीर शेख (रा. अष्टगाव, ता. राहता, जि. अ.नगर) यांनी संगनमत केले. विवाहितेला मुलबाळ होत नाही, असे बोलून मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच घर घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करुन तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले व तिला घराबाहेर काढून दिले.
या त्रासाला कंटाळून पिडीत विवाहितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.