नाशिक (प्रतिनिधी) :- बचत गटाच्या कामासाठी आलेल्या महिलेचा रस्ता अडवून तिचा विनयभंग करणार्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की पीडित महिला ही काल सकाळी 11 वाजता वृंदावननगर येथे एका सोसायटीत बचत गटाच्या मीटिंगसाठी आली होती. त्यावेळी ही महिला एका फ्लॅटसमोर उभी असताना त्याच परिसरात राहणारा आरोपी बंटी कोळी तेथे आला व “तुला या एरियात राहायचे आहे की नाही? उतर बिल्डिंगच्या खाली. तुला माहीत आहे का मी कोण आहे?” असे बोलून पीडित महिलेजवळ आला.
पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, तसेच “तुला व तुझ्या नवर्याला मारून टाकीन. तुझ्यावर बलात्कार करीन,” अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी बंटी कोळीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.