नाशिक (प्रतिनिधी) :- मागील आठ दिवसापासून बंद असलेल्या पावसाने आज संध्याकाळी नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली. नाशिक शहरासह लगतच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते हे जलमय झाले होते, तर नदीतील पाण्याचा विसर्ग देखील पावसाने वाढला होता. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार नाशिक शहरामध्ये आणि लगतच्या परिसरात सुमारे 25 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. आज दिवसभर मोठ्या प्रमाणावर उघडीप देखील होती. गुरुवारी नाशिकचे तापमान दुपारी 32.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले होते. परंतु काल बुधवारी बदललेल्या नवीन नक्षत्रानंतर पावसाने आज नाशिक शहर आणि लगतच्या परिसरात चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत म्हणजे दोन तास जोरदार हजेरी लावली. यामुळे नाशिक शहरातील राजीव गांधी भवन परिसर, मेनरोड, दहीपुल, सराफ बाजार या भागामध्ये पाणी साचले होते. शहराच्या इतर भागातही काही प्रमाणामध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यासाठी कसरत करावी लागली.
दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही काळासाठी नासिक मधील जनजीवन हे ठप्प झाले होते . जोरदार पाऊस असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली होती तर नागरिकांनी पावसापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आडोसा घेतल्याचे देखील घेऊन उभे होते.