नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्यामागे असलेल्या अपार्टमेंटमधील बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.विशेष म्हणजे हे गाळे जवळपास पंधरा वर्षांपासून बंद असल्याचे गाळा मालकांनी सांगितले. भरवस्तीत केमिकलमध्ये ठेवलेली मानवी अवयव आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्यामागे एका सोसायटीत असलेल्या गाळ्यांपैकी एका गाळ्यातून दुर्गंधी येत होती. परिसरातील नागरिकांनी याबाबत मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली. त्वरीत तेथे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे, दीपाली खन्ना, गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहोकले घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तो गाळा उघडला असता तेथे भंगाराच्या साहित्यासोबत दोन कॅन पोलिसांना दिसल्या. त्या कॅन उघडून पाहिल्या तेव्हा त्यामध्ये द्रव रसायनामध्ये मानवी अवयव ठेवल्याचे आढळून आले. त्यामध्ये चार कान, चेहर्याचे दोन वेगळे अवयव यांचा समावेश होता. पोलिसांनी याबाबत गाळा मालकास विचारणा केली असता गाळा मालक शुभांगीनी शिंदे यांनी हा गाळा गेल्या 15 वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले.
दरम्यान शुभांगीनी शिंदे यांना तीन मुले असून, एक डेंटिस्ट, एक फार्मसिस्ट व एक इएनटी स्पेशालिस्ट असल्याचे समजले. त्यांच्याकडून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता वैद्यकिय शिक्षणासाठी मानवी अवयव सन 2005 मध्ये आणल्याचे शिंदे यांनी सांगितले. परंतु त्यानंतर आजपर्यंत हा गाळा बंदच होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या प्रकारे मानवी अवयव खासगी ठिकाणी ठेवता येतात का? याबाबत पोलीस माहिती घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे कुटुंबियांना माहितीसाठी काल पोलिसांनी बोलविल्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात येऊन त्यांना सोडण्यात आले. पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत.