भुताळपणाच्या संशयामुळे ८ आदिवासी कुटुंबांचे घरे मोडून स्थलांतर

 

इगतपुरी :– इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेकदा डोके बधीर करणाऱ्या करामती खमंगपणे चर्चेत येतात.

तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी ह्या आदिवासी पाड्यामध्ये तर ह्या अंधश्रद्धा जास्तच डोके वर काढत आहेत. मागील महिन्यात आजारी असणाऱ्या लहान बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्या बालकाला भुताळपण करून खाल्ले असा आरोप करून संबंधित कुटुंबाने ८ कुटुंबांची झोप उडवून टाकली.

रोजच भांडणे होऊन वाद वाढायला सुरुवात झाली. घोटी पोलिसांपर्यंत ही तक्रार गेल्यानंतर सर्व संबंधित व्यक्तींमधील समज गैरसमज दूर करण्यात आले. मात्र त्या ८ आदिवासी कुटुंबाचा ससेमीरा थांबलाच नाही. भांडणे, वाद आणि शिवीगाळ ह्या प्रकाराला सर्वजण कंटाळून गेले होते. अखेर हे सगळे ८ कुटुंब घरांची तोडफोड आणि घर मोडून सर्व साहित्यासह स्थलांतर करीत आहेत.

ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. भोरवाडी ह्या आदिवासी पाड्यातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगुबाई खडके, शांताराम खडके आणि अन्य २ अशा ८ कुटुंबाने गाव सोडून स्थलांतर सुरु केले आहे. ग्रामीण आदिवासी भागातील अंधश्रद्धा आदिवासी कुटुंबांच्या बोकांडी बसली असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!