मुंबई :- नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी सरकारकडून राज्यपालांना प्रस्ताव पाठवला होता. मात्र, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पद निवडणुकीचा हा प्रस्ताव नाकारला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करू शकत नाही, असे राज्यपाल यांनी स्पष्टीकरण दिल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

विधान सभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री आज विधिमंडळात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले आणि काँग्रेसचे आमदार भेटायला गेले. त्या भेटीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक व्हावी, ही मागणी काँग्रेस आमदारांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून तीन वेळा शिष्टमंडळ भेटले. निवडणूक प्रस्ताव दिला पण राज्यपालांनी मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या निवडणुकीतही भाजपकडून राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची तीन वेळ भेट घेतली आणि निवडणूक घेण्याची विनंती केली. दरम्यान, त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली होती. मात्र, सदिच्छा भेट असल्याचे सांगत आमची कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही, असे सांगितले होते.
महाविकास आघाडी सरकारच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर पडली आहे. राज्यपालांनी पुन्हा एकदा आघाडीचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळ राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.