नाशिकरोड (प्रतिनिधी):- नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गावात चोरट्यांनी आज पहाटे हैदोस घातला असून सोने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यात ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुकानाचा समावेश आहे.
नासिकरोड पोलीस ठाण्या पासून काही अंतरावर असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील पळसे गावात आज पहाटे चोरट्यांनी हैदोस घातला. किराणा दुकान व घरात प्रवेश करून चार तोळे सोने रोख रक्कम व काही किराणा सामानाची चोरी केली. युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला मात्र ते त्यामध्ये अपयशी ठरले.

आज पहाटे बंगाली बाबा येथील माऊली पार्क बिल्डींग मध्ये तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत राहणारे कृष्णा पाटील हे सहपरिवार बाहेर गावी गेल्याचा फायदा घेऊन त्यांची घरफोडी करून चोरट्यांनी पाच तोळे सोने, रोख रक्कम व इतर ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कॉलनी मधील भास्कर जाधव यांचे किराणा दुकान फोडून लागून असलेल्या घरात प्रवेश केला व घरातील चार तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली.
महामार्गावरील युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नाशिक सिन्नर महामार्गावरील ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या रत्ना मधुकर पगार यांच्या इच्छामणी किराणा दुकानाकडे वळवत तेथून दहा हजाराची रोख रक्कम लांबवली. युनियन बँकेच्या जवळ असलेल्या शशिकांत विष्णू गायखे यांच्या कार्यालयात प्रवेश मिळून चोरटे कागदपत्रे पाहून माघारी फिरले. त्यानंतर चोरट्यांनी अरुण गायधनी यांचे दुकान फोडून रोख रक्कम लंपास केली.
अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे कैद झाले आहेत. एकाच वेळी सहा ते सात ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरफोडीत सोन्या चांदीच्या दागिन्यासह सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
सकाळी चोऱ्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावाचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाची मदत घेतली, मात्र चोरट्यांचा सुगावा लागू शकला नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.