नाशिक (प्रतिनिधी) : सराफी दुकानाच्या शटरचे व त्या शेजारील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून दोन्ही ठिकाणांहून सुमारे सव्वादोन लाखांचा सोन्याचांदीचा ऐवज लुटून नेल्याची घटना जय भवानी रोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अरुण कृष्णा कपोते (रा. लवटेनगर, नाशिकरोड) यांचे जय भवानी रोड येथे परंपरा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर, ग्रील व साईड लॉकचे कुलूप अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश केला, तसेच दुकानाच्या शेजारी राहणार्या सुनीता सुरेश बडवे (रा. जय भवानी रोड, नंदनवन कॉलनी, नाशिकरोड) यांच्याही राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला.

यावेळी चोरट्याने काचेच्या शोकेस व ड्रॉवरमध्ये ठेवलेले १८ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, ६० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २० नथी, ३० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या नाकातील सोन्याच्या १० मुरण्या, ३० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या १० रिंगा, २८ हजार रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची चांदीची पायल,
२८ हजार रुपये किमतीचे १०० ग्रॅम चांदीचे देव व मूर्ती, सहा हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाचे चांदीचे स्टर्लिंग, ८ हजार रुपये किमतीचा वजनकाटा, तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख १८ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे करीत आहेत.