नाशिक (प्रतिनिधी) :- औषधोपचाराच्या बिलावरून झालेल्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याचा प्रकार मुंबई नाका येथे घडला.

याबाबत डॉ. सुषमा प्रशांत भुतडा (वय 50) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी प्रवीण खैरे यांनी पत्नी सुनीता खैरे हिला दि. 30 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता अशोका मार्ग येथे असलेल्या सुप्रेम हेल्थ अॅण्ड ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. यादरम्यान त्यांचे हॉस्पिटलचे बिल 30 हजार व मेडिकलचे बिल 19 हजार 845 रुपये झाले होते.

यावरून आरोपी प्रवीण खैरे याने या बिलावरून डॉ. भुतडा यांच्याशी वाद घातला. आम्हाला न विचारता रुग्णाला गोळ्या व औषध दिले, तसेच जास्त बिल लावले, असे बोलून डॉक्टरांचे अंगावर धावून जात अपशब्द वापरले. “तुम्हाला बघून घेतो,” अशी दमदाटी करून खैरे यांनी रुग्णाची नणंद वैशाली बनसोड व एक साथीदार यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेत गोंधळ घातला. या प्रकरणी डॉ. भुतडा यांच्या फिर्यादीनुसार तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गेंगजे करीत आहेत.