पुढील २४ तासात थंडीचा जोर होणार कमी; “या” भागात पावसाची शक्यता

मुंबई : सध्या देशभरामध्ये थंडीची लाट पसरली आहे. अनेक राज्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. दरम्यान, कडाक्याच्या थंडीचा सामना करणाऱ्या उत्तर भारतामधील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २४ तासांमध्ये थंडीची लाट कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु, त्यानंतर काही भागात पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स २० जानेवारीच्या रात्री हिमालयीन भागांमध्ये पोहोचणार आहे. जो २५ जानेवारीपर्यंत राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे २१ जानेवारीपासून डोंगरावर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य भारतामधील मैदानी भागांमध्ये २३ ते २५ जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

२२ आणि २३ जानेवारीला पंजाबच्या काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २४ आणि २५ जानेवारीलादेखील पाऊस पडल्याची शक्यता आहे. २२ जानेवारीला दिल्लीसह चंदीगड आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता आहे. २५ जानेवारीला देखील दुर्गम भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये २३ जानेवारीला काही भागात, तर २४ जानेवारीला बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ आणि २५ जानेवारीला पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१९ आणि २० जानेवारी रोजी तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ३ दिवस तापमानात विशेष बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. आज (दि. १९) उत्तर राजस्थानच्या विविध भागात थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे. तर, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर थंडी कमी होईल.

गेल्या २४ तासांत पंजाब, दिल्ली, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी कायम आहे. बहुतांश ठिकाणी १ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानमधील सीकरमधील चुरु येथे उणे १.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!