नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : जगभरातील अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. तर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2,85,914 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 665 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4,91,127 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तसेच डेली पॉझिटिव्ही रेट 16.16 टक्क्यांवर आहे.तर देशातील तीन कोटी कोरोनाग्रस्तांपैकी 22,23,018 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर देशात आतापर्यंत तब्बल 1,63,58,44,536 लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 33,914 नवीन रुग्ण (Patient) आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 75,69,425 झाली आहे, तर 86 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,42,237 वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ओमायक्रॅानच्या 2,858 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,534 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून राज्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,02,923 झाली आहे. या दरम्यान राजधानी मुंबईत संसर्गाची 1,815 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात गेल्या 24 तासांत 30,500 रुग्ण बरे झाले असून त्यानंतर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 71,20,436 झाली आहे. तर संसर्गातून बरे होण्याचा दर 94.07 टक्के आहे.