Home देश नागरिकांना रेशन कार्डशी संबधित सेतू सुविधा केंद्रात मिळणार ‘या’ सेवा

नागरिकांना रेशन कार्डशी संबधित सेतू सुविधा केंद्रात मिळणार ‘या’ सेवा

0

नवी दिल्ली | भ्रमर वृत्तसेवा : रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब लोकांना सरकारतर्फे जारी करण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. तसेच रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणीही येत असतात. त्यामुळे सरकारने लोकांचा त्रास कमी करण्यासाठी डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत काही प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामाध्यमातून नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीने रेशन कार्ड अपडेट करता येऊ शकते.  

डिजीटल इंडियाने ट्विटरमध्ये म्हटले आहे की, सेतू सुविधा केंद्रांनी सार्वजनिक वितरण विभागाशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे देशातील 3.70 लाख सेतू सुविधा केंद्रांमधून रेशन कार्डशी संबंधित सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा देशातील 23.64 कोटी रेशन कार्डधारकांना फायदा होईल, याचा विश्वास आहे. तसेच जवळच्या कॉमन सर्विस सेंटरच्या माहितीसाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड नागरिकांना दिले जाते. दारिद्र्य रेषेवरील लोकांना एपीएल, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांकरिता बीपीएल आणि सर्वात गरीब असलेल्या नागरिकांना अंत्योदय ही तीन प्रकारची रेशन कार्ड दिली जातात. ही वर्गवारी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर निश्चित केली जाते. तसेच देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला रेशन कार्डासाठी अर्ज करता येईल. 18 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा रेशन कार्डामध्ये समावेश करण्यात येतो. जर 18 वर्षांहून अधिक वय असेल तर रेशन कार्डासाठी अर्ज करता येतो. तर ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजनेची देशात अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांना केंद्रित ठेवून योजनेचे स्वरुप तयार करण्यात आले आहे. या योजनेमधून अन्न सुरक्षा कायदा आणि इतर सामाजिक योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सेतू सुविधा केंद्रात नागरिकांना मिळणार या सेवा

रेशन कार्ड किती उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.

रेशन कार्डाशी संबंधित माहिती सेतू सुविधा केंद्रात अपडेट करता येईल.

रेशन कार्ड हरविले तर नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करता येईल.

रेशन कार्डामधील तपशीलामध्ये माहिती अपडेट करता येईल.

रेशन कार्ड हे आधारशी संलग्न करता येईल.

रेशन कार्डची नक्कल प्रिंट काढता येईल.