नवी दिल्ली :– भारताने ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी दणदणीत पराभव करत 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने ही कामगिरी सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा केली आहे. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल.

भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा शिल्पकार कर्णधार यश धुल ठरला. त्याने कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावले. शेख रशिदने 94 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीदने तिसऱ्या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला निर्धारित 50 षटकांत पाच बाद 290 धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालने तीन आणि निशांत संधूने दोन फलंदाजांना माघारी धाडले.

अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कॅप्टन यश धुलने 110 चेंडुमध्ये 110 धावा केल्या. त्यात 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. रशीदने 108 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 94 धावा केल्या. भारताचे 2 गडी बाद 37 धावा फलकावर असतांना यश धुल आणि शेख रशीदने तिसऱ्या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी रचून भारताला मजबूत स्थितीत आणले.
ऑस्ट्रेलिया तर्फे लेचलान शॉने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोरी मिलरने 38 आणि ओपनर कॅम्पबेलने 30 रन्सचे योगदान दिले. भारताकडून डावखुरा स्पिनर विकी ओस्तवालने 42 रन देऊन 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय निशांत सिंधू आणि रवी कुमार यांनीही प्रत्येकी 2-2 बळी घेतले.कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी 1-1 बळी घेतले.