नाशिक (प्रतिनिधी) :- अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेला वेळीच उपचार मिळाल्याने तिला जीवदान मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की शनिवारी (दि. 6) सकाळी 6.35 वाजता नाशिक-पुणे रोडवर सुविचार हॉस्पिटलजवळ पौर्णिमा स्टॉपच्या पुढे आरती देवीदास परदेशी (वय 32) ही महिला साई रुद्रा आश्रमात काम करते व तेथेच राहते. या रस्त्याने कामावर पायी जात असताना अज्ञात वाहनचालकाने त्यांना धडक दिली. त्यात महिलेच्या डोक्यास व हातापायास मार लागल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.
यावेळी अल्ताफ युसूफ शेख (रा. बागवानपुरा, जुने नाशिक) यांनी ही घटना पाहून अॅम्ब्युलन्सच्या चालकाला फोन केला असता केवळ औपचारिक विचारसूस करून कोणत्याही प्रकारे मदत उपलब्ध झाली नाही. त्यांना घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितल्यानुसार त्यांनी पोलिसांच्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. नियंत्रण कक्षामार्फंत तत्काळ मुंबई नाका पेालीस ठाणे हद्दीतील मोबाईलशी संपर्क करून लागलीच अंमलदारांना घटनास्थळी रवाना केले.
हेल्पलाईन मोबईलवरील अंमलदार पोलीस नाईक संजय महाजन, संतोष साळवे व भद्रकाली पोलीस ठाण्याकडील डेल्टा मोबाईल चालक पोलीस अंमलदार फरीद इनामदार व रवींद्र जाधव यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त महिलेला तत्काळ सरकारी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त महिला हिला वेळीच वैद्यकीय मदत मिळवून देऊन तिला जीवदान मिळाल्याने तिने पोलिसांचे आभार मानले.
नियंत्रण कक्षामार्फंत हेल्पलाईन नंबरवर मदत मागणारे इसम अल्ताफ युसूफ शेख (रा. बागवानपुरा, जुने नाशिक यांच्याकडे मदतीसाठी आलेले अंमलदार यांनी कशाप्रकारे मदत केली याबाबत विचारणा केली.
पोलिसांनी अशाच प्रकारे नागरिकांना उत्स्फूर्तपणे मदत करावी म्हणून पोलीस अंमलदारांचा मनोबल उंचावण्याकरिता पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस अंमलदार संजय महाजन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले.