बंगळुरू । भ्रमर वृत्तसेवा : टाटा IPL 2022 लिलावाचा आज पहिला दिवस असून आज 106 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. तसेच या लिलावात एकूण 160 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. तर या लिलावात एकूण 590 खेळाडू भाग घेणार आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तानसह जवळपास सर्वच देशांतील खेळाडूंचा समावेश असणार आहे. एकूण 220 परदेशी खेळाडू, तर 370 भारतीय खेळाडू लिलावात असतील. यापैकी 228 कॅप केलेले आणि 355 अनकॅप्ड खेळाडू असणार आहेत.
तसेच आयपीएलच्या लिलावाला सुरुवात झाली असून भारताचा डावखुरा फलदांज शिखर धवन पासून बोलीला सुरुवात झाली. शिखर धवनसाठी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सने संघात घेण्यासाठी बोली लावली. अखेर पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रुपये खर्च करत धवनला संघात घेतले आहे. त्यानंतर रविचंद्रन अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने रस दाखवला त्याला राजस्थानने ५ कोटींमध्ये आपल्या संघात घेतले आहे.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी कोलकाता नाइट रायडर्सने बोलीची सुरुवात केली. तर गुजरात टायटन्सने कमिन्ससाठी बोली लावली.त्यानंतर केकेआरने त्याला ७.२५ कोटींमध्ये आपल्या संघात घेतले.तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला पंजाब संघाने ९.२५ कोटी रुपयांना संघात घेतले आहे.तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बोली लावली.त्यानंतर राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत बोल्टला संघात घेतले.
तसेच मुंबईकर श्रेयस अय्यरसाठी बंगळुरूने बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही रस दाखवला. शेवटी केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला आपल्या संघात घेतले. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली लावली. त्यानंतर त्याला ६.२५ कोटी देत गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा फलदांज डु प्लेसिसला ७ कोटी देत आरसीबीने संघात घेतले. तर आफ्रिकेचा धाकड सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकला ६.७५ कोटींची बोली लावत लखनऊ सुपर जायंट्सने संघात घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी ६.२५ कोटी देत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील केले. तर भारताचा फलंदाज मनीष पांडेसाठी सनरायझर्स हैदराबादने बोलीची सुरुवात केली. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने ४.६० कोटी देत आपल्या संघात घेतले.
तर वेस्टइंडिजचा फलंदाज शिरोन हेटमायरसाठी दिल्ली आणि राजस्थान संघाने चुरस दाखवली. शेवटी त्याला राजस्थान रॉयल्सने ८.५० कोटी देत आपल्या संघात घेतले. तसेच भारतीय अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाची बेस प्राइज २ कोटी होती. त्याला चेन्नई सुपर किंग्जने त्याच किमतीत संघात घेतले. दुसरीकडे इंग्लडचा तडाखेबाज फलंदाज जेसन रॉयसाठी २ कोटी देत गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतले. तसेच सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कलसाठी आरसीबी आणि सीएसकेने रस दाखवला. शेवटी राजस्थान रॉयल्सने ७.७५ कोटी देत संघात घेतले आहे. तर वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होसाठी चेन्नई सुपर किंग्जने बोली उघडून त्याला ४.४० कोटी देत संघात घेतले आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर, भारताचा सुरेश रैना, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, बांगलादेशचा शाकिब अल हसन हे खेळाडू यंदाच्या आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ साठी अनसोल्ड राहिले आहेत.
– डावखुरा फलंदाज नितीश राणासाठी सुरुवातीला आरसीबीने बोली लावली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि केकेआरने जोर धरला. ८ कोटी देत केकेआरने त्याला संघात घेतले.
– अष्टपैलू खेळाडू होल्डरला ८.७५ कोटींची बोली लागली. लखनऊ संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.