मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी आज आणि उद्या ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने काल १० खेळाडूंची नावे जोडली आणि त्यामुळे एकूण ६०० खेळाडू ऑक्शनच्या रिंगणात आहे. ६०० खेळाडूंपैकी आज ९८ खेळाडूंवर बोली लावणार आहे आणि रविवारी लंच ब्रेकपर्यंत १६१ खेळाडूंवर बोली पूर्ण करण्यात येणार आहे.
पहिल्या सहा सेट्समद्ये ५४ कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे आणि ७व्या सेटनंतर अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. तर या वेळच्या ऑक्शनमध्ये मागील सर्व विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी 8 नव्हे तर 10 फ्रँचायझी आयपीएल मेगा लिलावात सहभागी होत आहेत, त्यामुळे सर्व फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात खेळाडूंचा समावेश करण्यासाठी कडवी झुंज मिळणार आहे. यावेळी देखील लिलाव ब्रिटनचे ह्यू अॅडम्स करणार आहेत.
दरम्यान आयपीएल लिलावात (IPL Auction) अॅडम्सचे नेतृत्व करण्याची ही चौथी वेळ असेल. तसेच एकूण 900 कोटी रुपयांच्या लिलावाच्या बजेटपैकी फ्रँचायझीने आधीच क्रिकेटपटूंना कायम ठेवण्यासाठी 384.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच लिलावादरम्यान दहा फ्रँचायझींना उर्वरित 515.5 कोटी रुपये त्यांच्या आवडीचे खेळाडू खरेदी करण्यासाठी वापरायचे आहेत. तसेच मागील ऑक्शनमध्ये जवळपास १४५ कोटी रुपये खर्च करून सर्व फ्रँचायझींनी खेळाडू विकत घेतले होते.