मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : जगातील श्रीमंत टी-20 क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे आज आणि उद्या रंगणाऱ्या या महालिलावात एकूण ५९० खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसणार आहेत.

या लिलावात नोंदणी झालेल्या ५९० खेळाडूंपैकी २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. तसेच लिलावाच्या पहिल्या दिवशी केवळ १६१ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. तसेच या लिलावात १० नवीन खेळाडूंची भर पडली असून BCCIने अखेरच्या क्षणाला या १० खेळाडूंची एन्ट्री स्वीकारली आहे आणि त्यामुळे आता एकूण ६०० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
दरम्यान बीसीसीआयने या लिलावात अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजयी संघातील अग्विवेश अयाची, रोहन राणा , नितिश रेड्डी, हार्दिक तामोरे, मिहिर हिरवानी, साईराज पाटील, मोनू सिंग, निवेदन राधाकृष्णन, लान्स मॉरिस, आरोन हार्डी या दहा खेळाडूंचा नव्याने समावेश केला असून त्यांची मुळ किंमत २० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.