नाशिक :- महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ अंतर्गत भागांत होणाऱ्या भारनियमनाचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियावर पसरविले जात असून सदर वेळापत्रक वाचून ग्राहकांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण होत आहे, तरी रहिवासी भागातील भारनियमनाचे कुठलेही वेळापत्रक सद्यस्थितीत महावितरणच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले नसून ग्राहकांनी अनधिकृत माहितीवर वा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. विजेची वाढती मागणी व कोळश्याअभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार वीजवाहिन्यांवर विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागत आहे. मात्र नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या विविध भागात दिवसभरात विविध वेळेमध्ये तीन ते साडेतीन तास भारनियमन होणार असून शहरातील विविध भागातील दिवसनिहाय वेळापत्रक सुद्धा या बनावट जाहीर सुचनेमध्ये देण्यात आलेले आहे. मात्र महावितरणच्या वतीने भारनियमनाचे वेळापत्रक आजमितीस तयार करण्यात आले नसून सदर माहितीमुळे ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो.
तरी ग्राहकांनी अफवावर विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमावर माहितीची खात्री करूनच पुढे पाठवावी, जेणेकरून गैरसमज व संभ्रम निर्माण होणार नाही असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.