नाशिक (प्रतिनिधी):- नाशिकच्या ईश्वरी सावकारची मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीए च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे.
माजी कसोटीपटू व्हि .व्हि .एस. लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए बेंगळुरू येथे भारतभरातील उदयोन्मुख होतकरू खेळाडूंसाठी 1 ऑगस्टपासून महिनाभराचे हे शिबीर घेणार आहे. बीसीसीआय 19 वर्षांखालील वयोगटात संभाव्य निवडक गुणी खेळाडूंना 2023 साली साऊथ आफ्रिकेत होणार्या पहिल्या विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी करत आहे. ईश्वरी सावकारची यापूर्वी मे-जून मधील राजकोट येथे झालेल्या शिबीरासाठी निवड झाली होती. या शिबिरातून बीसीसीआयने सहा संघ तयार केले होते. त्यांच्यात विजयवाडा येथे झालेल्या सामन्यांत ईश्वरीने दोन नाबाद शतके व दोन अर्धशतकांसह सर्वाधिक 509 धावा केल्या. याबरोबरच गेल्या हंगामातील विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे या अतिशय महत्वाच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड झाली आहे.
ईश्वरीप्रमाणेच महाराष्ट्रातील आणखी 3 मुलींची निवड या 19 वर्षांखालील वयोगटातील शिबीरासाठी निवड झाली आहे. सलामीवीर ईश्वरी सावकारने 19 वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध 86 तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज 73 धावा असे , जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी च्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. याच जोरावर ईश्वरीची एप्रिल महिन्यात पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती.
या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, प्रशिक्षक मंगेश शिरसाट, भावना गवळी तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.