नवीन नाशिक (वार्ताहर) : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे एका 65 वर्षीय वृद्धाचा हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच पुतण्यासह एका विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बच्चू सदाशिव कर्डेल (वय 65, रा.कर्डेल मळा,सातपूर-अंबड लिंक रोड,एक्सलो पॉईंट, अंबड,नाशिक ) यांची दि. 25 नोव्हेंबरला सायंकाळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या करून त्यांच्या घरातील कोठीतून सुमारे पाच लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली होती. या हत्येचा प्रकार गुंतागुंतीचा होता.

याप्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मयत बच्चू यांच्या भावाचा मुलगा सागर वाळू कर्डेल (वय 28,रा. कर्डेल मळा,सातपूर-अंबड लिंकरोड,एक्सलो पॉईंट अंबड, नाशिक) याला पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याच्या वडिलांसोबत मयत बच्चू यांचे कौटुंबिक वाद असल्याने त्याचा राग मनात धरत त्याच्या अल्पवयीन मित्राला सुपारी देऊन काका बच्चू यांचा खून करण्यास सांगून स्वतः घरातील लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नातेवाइकांसमवेत उपस्थित राहिल्याची कबुली दिली. पोलिसांनी सागर याच्या विधिसंघर्षित मित्राला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान संशयिताने रोख रक्कम असलेली कोठी नेमकी कोठे ठेवली आहे ? खुनाचा घटनाक्रम कसा होता? व संशयित विधिसंघर्षित बालकासमवेत अन्य कुणी होते का? याचा पोलीस तपास करत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, उपायुक्त परिमंडळ-1 किरण चव्हाण, उपायुक्त परिमंडळ 2 चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक सोनल फडोळ, उपनिरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, उपनिरीक्षक नाईद शेख, हवालदार संजीव जाधव, रविंद्र पानसरे, पवन परदेशी, किरण गायकवाड, समाधान चव्हाण,
जनार्दन ढाकणे, दिनेश नेहे, अमिर शेख, विनायक घुले, सचिन करंजे, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, कुणाल राठोड, समाधान शिंदे, किरण सोनवणे, घनश्याम भोये, दिपक जगताप, संदीप भुरे, राकेश राऊत, प्रशांत नागरे, नितीन सानप,अनिल गाढवे, तुषार देसले, धनराज बागुल, बिराजदार, संदीप राजगुरु, मोतीराम वाघ यांनी ही कामगिरी पार पाडली. याप्रकरणी पुढील तपास सपोनि किशोर कोल्हे करत आहेत.