नाशिक : सोनी मराठी वाहिनीवरील झालेल्या ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाला रसिकांनी उत्तम दाद दिली आहे. ऑडिशन राउंडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली होती आणि आता त्यातलेच टॉप ५ स्पर्धक महाराष्ट्राला मिळाले आहेत. जगदिश चव्हाण , प्रतिक सोळसे , सागर म्हात्रे , श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. या ५ स्पर्धकांनी त्यांच्या दमदार आवाजाने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील जगदिश चव्हाण या स्पर्धकाने जिद्दीने महाअंतिम फेरी मध्ये धडक मारली.
सुरांच्या या प्रवासात अनेक सुंदर आणि अविस्मरणीय गोष्टी जगदिश सोबत घडल्या. जगदिश चव्हाण याला त्याच्या सांगीतिक प्रवासासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी त्याची आई इंडियन आयडल मराठीच्या मंचावर आली. परीक्षकांनी वेळोवेळी जगदिशचं कौतुक केलं. त्याच्या उत्तम सादरीकरणासाठी त्याला झिंगाटही मिळालं. नाशिकहून मुंबईला येऊन, ऑडिशन राउंड ते महा अंतिमफेरी असा जगदिशचा प्रवास कौतुकास्पद असून ‘इंडियन आयडल मराठी’ चा विजेता तो होणार की नाही, याची उत्सुकता रसिकांना आहे. जगदिशला गजल , सुफी प्रकारातील गाणी गायला खूप आवडतं. त्याचबरोबर भक्तीगीते आणि अभंगांमध्ये तो खूप छान रमतो असं परीक्षक अजय-अतुल यांचं मतआहे. त्याचबरोबर हिंदी गाणी गाण्याचाही चांगला प्रयत्न जगदिशने ‘इंडियन आयडल मराठी’ च्या मंचावर केला.
‘इंडियन आयडल मराठी’ चा विजेता होण्यासाठी जगदिश पूर्ण मेहनत घेतो आहे. अंतिमफेरी मध्ये जगदिश सादरीकरण कसा करतो आणि अंतिमफेरीचा विजेता ठरतो की नाही हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहा , ‘इंडियन आयडल मराठी’, महाअंतिम सोहळा, १८ ते २० एप्रिल , सोम. ते बुध. रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.