नाशिक (प्रतिनिधी):- नाशिकच्या जय मोडक यांची स्वीडन येथे होणार्या डब्ल्यूटीटी जूनियर आणि युथ कंडेन्डर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार्या भारतीय टेबल टेनिस मुलींच्या संघाचे प्रशिक्षिक म्हणून निवड झाली. या स्पर्धा हेलसिंगबर्ग स्वीडन येथे 12 ते 14 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत.

2021 मध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवणारी कु. सायली वाणी व 2022मध्येे 17 वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवणारी कु. तनिशा कोटेचा या दोन्ही खेळाडू जय मोडक याच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या आहेत. तनिशा कोटेचा ही सध्या 17 वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावरची प्रथम मानांकित खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे 42 वे मानांकन आहे तसेच सायली वाणी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर 79 व्या या स्थानावर आहे.
आज या दोन्ही खेळाडू राष्ट्रीय नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत आहेत. जय यांचे मार्गदर्शनाखाली तयार होत असलेला मुलांच्या गटातील कुशल चोपडा हा खेळाडूही सध्या 15 वर्ष वयोगटात राष्ट्रीय स्तरावर तिसरा मानांकित खेळाडूं आहे. आजवर त्यांनी महाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे तेरा खेळाडू तयार केले आहेत तर त्यात 8 राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवीणारे टेबल टेनिसपटू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड , शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, संजय मोडक, मिलिंद कचोळे, अभिषेक छाजेड, सुहास आघारकर आदींनी अभिनंदन केले.