जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर; “यांचा” होणार सन्मान

नाशिक : नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांच्या उपयोगाने नवीन पर्व सुरु करणाऱ्या ‘जनस्थान’ या व्हाट्सअप ग्रुपचा आठवा वर्धापन दिन दिनांक २० जून ते २५ या दरम्यान नाशिकमध्ये साजरा होत असून त्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या आयकॉन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते व लेखक दीपक करंजीकर, ग्रंथमित्र विनायक रानडे आणि कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना यंदाचा जनस्थान आयकॉन पुरस्कार कवी अशोक बागवे यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती जनस्थानचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली.

दीपक करंजीकर यांनी भारतात आणि भारताबाहेर हे मराठी नाटक या विषयावर विशेष काम केले असून मराठी नाटकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा विविध भूमिका त्यांनी पार पडल्या आहेत. शासकीय-निमशासकीय अशा संस्थांवर महत्त्वाची पदे भूषविताना करंजीकर यांच्याकडून भारतीय पातळीवरील सांस्कृतिकचेही काम हातावेगळे होत आहे. त्यांच्या याच कामाचा बहुमान म्हणून त्यांना यंदाचा आयकॉन पुरस्कार दिला जात आहे.

विनायक रानडे यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी…’ या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचन आणि वाचक चळवळीला देश आणि देशाच्या बाहेर अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचविले असून त्यांचे हे काम वाचनसंस्कृतीला बळ देणारे ठरले आहे. अतिशय वेगळी कल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी ग्रंथप्रसाराचे मोलाचे काम केले आहे.

प्रकाश होळकर यांचा ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहापासून सुरू झालेला प्रवास आजही सुरू आहे. चित्रपटगीते, अभ्यासक्रमात कविता याबरोबरच साहित्य-संस्कृती संस्थांमधील मानाची पदे ते आज भूषवित आहेत. ना धों महानोर यांच्यानंतर मराठी कवितेला एक वेगळा चेहरा देण्याचे श्रेय प्रकाश होळकर यांना जाते त्यामुळे त्यांचाही जनस्थान आयकॉन पुरस्कार देऊन या सोहळ्यात सन्मान होईल.

या सोहळ्यासाठी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून कवी अशोक बागवे येणार असून त्यांच्या हस्ते या तिघांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या ज्ञानाचा आणि कवितेचा अनुभव या सोहळ्यात नाशिककरांना घेता येईल.

‘जनस्थान’ हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा पाच दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून यात दि. २३ रोजी सायंकाळी 6 वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या महोत्सवाचे सूत्र ‘पंचतत्व’ या विषयावर आधारित आहे. चित्र शिल्प प्रदर्शनातील चित्राकृतीदेखील याच विषयावर असून शिल्पकार दोन दिवस प्रत्यक्ष शिल्पनिर्मिती करून दाखवणार आहेत. याबरोबरच नाशिकमधील कवी ‘पंचतत्व’ हा विषय घेऊन स्वतंत्रपणे कवितालेखन करीत असून त्याला ग्रुपमधील संगीततज्ज्ञ संगीत साज चढवीत आहेत.तसेच जनस्थान मधील कलावंतांच्या अनोख्या नृत्याच्या कार्यक्रमाने जनस्थान फेस्टिव्हलची सांगता होईल. त्यामुळे या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे स्वानंद बेदरकर, विनोद राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!