येवला : चिचोंडी बुद्रुक (ता.येवला) येथील भारतीय सैन्यात आरमाड विभागातील जवान नारायण निवृत्ती मढवई (वय ३९) यांना हिसार (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त आले.

येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक हे गाव सैनिकांचे गाव म्हणून नावारुपास आलेले असून गावातील सर्वात पहिले भारतीय सैन्य दलातील जवान म्हणून नारायण मढवई यांचे नाव आहे. काल (दि.१०) रात्री आपल्या कर्तव्य बजावून तेथील आपल्या निवासाकडे बाईकवर निघाले असताना त्यांच्या गाडीची व टॅंकची (रणगाडा) धडक बसल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती कुटूंबियांनी दिली आहे.

आज (दि.११) सकाळी 7 वाजता त्यांना वीरमरण आल्याची बातमी गावात पसरली आणि गावासह येवला तालुक्यात शोककळा पसरली. २९ जानेवारी २००३ मध्ये सैन्यात भरती झालेले नारायण मढवई हे गावातील पहिले सैनिक होते. त्यांच्या पश्चात शेतकरी वडील निवृत्ती मढवई, आई ताराबाई, पत्नी सोनाली (वय ३३), मुलगा कृष्णा (वय १३), हरीश (वय १०), भाऊ बाळासाहेब, भाऊसाहेब असा मोठा परिवार आहे. शेतकरी कुटुंबातील मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले नारायण मढवई यांच्या शहीद होण्याची बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली. दरम्यान प्रशासनाने नारायण मढवई यांचे पार्थिव उद्या (दि.१२) सकाळी येवला तालुक्यात येणार असून शासकीय इतमामात उद्या (दि.१२) रोजी त्यांच्या निवासस्थानी शेतातच अंत्यविधी करण्यात येणार आहे.