कपड्याच्या व्यापारापासून सुरुवात करून बांधकाम व्यवसायात उतरलेले वासुदेव ललवाणी यांनी जय डेव्हलपर्सची पायाभरणी केली आणि अल्पावधीत नावलौकिक मिळविला. त्यांनी व्यावसायिक मूल्यांना नेहमीच प्राधान्य देऊन व्यवहार केला. प्रारंभी प्रकल्प स्थळावरील पडेल ती कामे स्वत: करून श्रमप्रतिष्ठेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. आज त्यांच्याकडे पन्नासहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्या सर्वच प्रकल्पाला ग्राहकांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. दर्जेदार बांधकाम, वेळेत ताबा आणि शांत, मृदू संभाषणासह ग्राहकांचे हित जोपासणारे फार कमी लोक शिल्लक आहेत. त्यातील एक नाव म्हणजे वासुदेव ललवाणी. सचोटी, प्रामाणिकपणा आणि अविरत मेहनतीच्या अधिष्ठानावर यशाची उत्तुंग इमारत उभी करणारे जय डेव्हलपर्सचे वासुदेव ललवाणी यांचा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा आहे.

वासुदेव रामचंद्र ललवाणी यांच्या वडिलांचे भद्रकाली भागात छोटेसे स्टेशनरीचे दुकान होते. घरातूनच त्याना व्यापाराचे बाळकडू मिळाले. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ललवाणी यांनी प्रथम कानडे मारुती लेनमध्ये होजिअरीचे होलसेल विक्रीचे दुकान थाटले. तेथे ललवाणी एंटरप्रायझेसच्या माध्यमातून व्यापार केला. 1984 ते 1996 पर्यंत त्यांनी कपड्याचा व्यापार केला. ललवाणी एंंटरप्रायजेस, ललवाणी होजिअरी, फर्स्ट होजिअरी, हिरा होजिअरी अशी दुकाने सुरू करीत मेन रोड येथे त्यांनी व्यवसायिक विस्तार केला.

वासुदेव ललवाणी यांचा मित्रपरिवार बांधकाम व्यवसायातच होता. त्यांच्यापासून प्रेरणा आणि माहिती घेऊन त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात उडी घेतली. गारमेंटच्या दुकानातच व्यवसायासाठी छोटे ऑफिस थाटले. त्यावेळी चालू व्यापाराच्या ठिकाणाहूनच सर्व कारभार सुरू झाला. प्रथम अंबड गावाजवळ बारा रो-हाऊसचा प्रकल्प उभारण्याचे ठरविले. पूजा विहार या बारा रो-हाऊस प्रकल्पातून त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात पहिले पाऊल ठेवले. त्यावेळी नाशिकचा आतासारखा विकास झाला नव्हता. लोकांची क्रयशक्ती प्रचंड मोठी नव्हती. आतासारख्या घरकर्ज स्वस्त व्याज दरात उपलब्ध करून देणार्या फायनान्स कंपनीही फारशा नव्हत्या. तेव्हा पहिल्यांदा सदनिका, फ्लॅटचा प्रकल्प न उभारता ललवाणी यांनी प्रथम रो हाऊसचा प्रकल्प उभारण्याचे ठरवले. ललवाणी यांच्याकडे तेव्हा मोठा स्टाफ नव्हता. ते स्वत: प्रकल्पावर जाऊन सुपरवायझरचे काम करीत, देखरेख ठेवत. बिल्डर म्हणून वावरताना जेथे कमी पडेल तेथे ते स्वत: काम हाती घेत आणि पूर्णत्वास नेत. कामाचा ध्यास, अविरत कष्टाची तयारी आणि उच्च ध्येय ठेऊन त्यांनी प्रकल्पाच्या छोट्यातील छोट्या गोष्टीपासून सर्वच कामे ते स्वत: करीत. आज त्यांच्याकडे पन्नासहून अधिक लोक काम करीत आहेत. पुढे 2005 मध्ये शरणपूर रोडवर कॅनडा कॉर्नरजवळ त्यांनी मोठ्या जागेत ऑफिसचे स्थलांतर केले.आजही तेथूनच व्यवसाय सुरू आहे. आई-वडील आणि शिवशंकर यांना श्रद्धास्थानी मानणारे वासुदेव ललवाणी हे अत्यंत शांत, सुस्वभावी आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत. कुठल्याही गोष्टीचा ते कधी तणाव घेत नाहीत. घर-कुटुंब आणि व्यवसायातील कार्य यांना आपापल्या जागी ठेवून ते परिवारालाही वेळ देतात.

नाशिक हे वाडा संस्कृतीचे गाव मानले जाते. येथे लोकांना वाड्यात आणि स्वत:च्या बंगल्यात स्वतंत्रपणे राहण्याची जीवनशैली अधिक आवडते, हे हेरून त्यांनी रो-हाऊस प्रकल्प उभारण्याचे ठरवून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्याकाळी खाली आणि वर असे दुमजली रो-हाऊस केवळ 6 ते 8 लाखांपर्यंत रो-बंगले विक्री होत असे. 1990 च्या दशकात घरासाठी कोणी 30 लाखांच्या पुढे पैसे मोजण्यास तयार नसे, कारण याच पैशात स्वतंत्र जागा विकत घेऊन बंगलाही होत असे. त्यामुळे रो- हाऊसच्या किंमतीही फार नव्हत्या; मात्र गृहकर्जासाठी आजच्यासारखे 80 ते 90 टक्के कर्ज दिले जात नव्हते. ललवाणी यांनी अंबडमध्ये पहिला प्रकल्प उभारण्याचे ठरवले. तो परिसर कंपनीचे अधिकारी, लघु उद्योजक आणि श्रमिक, कामगारांचा होता. त्यांच्या पहिल्याच प्रकल्पाला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. याच काळात मखमलाबाद रोडवर विद्यानगर येथे त्यांनी 28 रो-बंगल्याचा प्रकल्प समांतरपणे सुरू केला होता. 6 बंगल्यांचा एक प्रकल्प, याप्रमाणे काम पूर्णत्वास नेत त्यांना टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण करुन शहरी गोंगाटापासून थोडे दूर निसर्गरम्य फार्म हाऊसचा फिल देणारा गृहप्रकल्प पूर्ण केला.

जय डेव्हलपर्सच्या कामाचा दर्जा, पारदर्शी चोख व्यवहार, उच्च व्यावसायिक तत्त्वे, बांधकामासाठी वापरले जाणारे दर्जेदार आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे मटेरिअल आणि वेळेत घराचा ताबा यामुळे बांधकाम व्यावसायिक म्हणून ग्राहकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधिकच दृढ झाला. अल्पावधीतच जय डेव्हलपर्सच्या दोन्ही प्रकल्पांना ग्राहकांनी 100 टक्के प्रतिसाद देत बुकिंग केली. जय डेव्हलपर्सने प्रारंभी मध्यमवर्गीयासाठी गृहप्रकल्प दिले आणि नंतर पुढे गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत त्यांनी प्रकल्प उभारण्याचे ठरविले. कॅनॉल रोडवरील साकारल्या जात असलेल्या साई सृष्टी प्रकल्पात 104 फ्लॅट आणि 13 मजली इमारत असलेला प्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. तेथे गार्डन, जिम, योगा हॉल, कम्युनिटी हॉल, ऑफिसेससह सर्व सुविधा आहेत. 2 आणि 3 बीएचके सदनिका ग्राहकांना उच्च दर्जाची जीवनशैली प्रदान करणार आहे.
तरुणांनो आरोग्य जपा.. तीच खरी संपत्ती..
तरुणाईने व्यायाम करायला हवा. पहाटे उठून योग, पोहणे अथवा कुठला तरी व्यायाम केलाच पाहिजे. त्यामुळे शरीर निरोगी राहते, असे ललवाणी सांगतात. निरोगी शरीरात निकोप मन अधिवास करते आणि शरीर निकोप असले, की संपत्ती कमवता येतेच, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
नवीन पिढीला संदेश
नवीन पिढीतील तरुणांना झटपट श्रीमंत व्हावेसे वाटते; मात्र यशाचा प्रवास प्रदीर्घ आणि कष्टाचा असतो. एका रात्रीत कोणी बिल्डर होऊन यशस्वी झाल्याचे ऐकीवात नाही. यासाठी तुमच्या पाठीशी आर्थिक पाठबळ भक्कम लागते. पैशाशिवाय काहीच होत नाही. आई-वडील, नातेवाईक, मित्रांचे सहकार्य व धोका पत्करण्याची प्रवृत्तीही हवीच. केवळ प्रचंड पैसा आहे. म्हणून कोणीही व्यक्ती यशस्वी बांधकाम व्यावसायिक होत नाही. तर त्यासाठी ज्या शहरात आपण राहतो तेथे आणि आजूबाजूंच्या शहरात आपला प्रामाणिकपणा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता हवी. उच्च व्यावसायिक मूल्य आणि सचोटीसह पारदर्शी व्यवहार हे तुमच्या अंगी हवे. लोकांना फसवून स्वप्न पूर्ण करण्याचा मोह ठेवता कामा नये. ईश्वरावर, आई-वडिलांवर निस्सीम श्रद्धा हवी. त्याच्याशिवाय यशाचे शिखर पादाक्रांत करता येणार नाही.