नाशिक :– सराफाच्या दुकानातून पावणे तीन लाख रूपयांचे दागिने दुकानातील कारागीरानेच चोरून पोबारा केल्याची घटना सराफ बाजारात घडली.

याबाबत प्रसाद रमेश बाबर (रा. जिजामाता रोड, दहिपूल, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की बाबर यांचे सराफ बाजारातील पगडबंद लेनमधील गजानन कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे. या दुकानात हिरापात्र (वय 40, रा. मोहिसडल, मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) हा मशीन ऑपरेटर कारागीर म्हणून कामाला होता.
त्याने 14 जून रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास दुकानमालक बाबर व दुसरा कारागीर बाहेर गेल्याची संधी साधून दुकानातील लाकडी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला 42 हजार रुपये किमतीचा 14 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, 15 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 24 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या मुरण्या, 54 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 44 हजार रुपये किमतीचा 48 ग्रॅम वजनाचा सोन्याच्या धातूचा गोळा, सहा हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून पळून गेला.
या प्रकरणी हिरापात्रा या कारागिराविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत.