कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलल्या; आता “या” तारखेला होणार निवडणूक

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड इथल्या विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. ही निवडणूक बिनविरोध केली जावी, यासंदर्भात राजकीय चर्चा सुरू झाली होती. परंतु, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यातच आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये आयोगाने बदल केले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने याआधी १८ जानेवारी रोजी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, तमिळनाडू आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशामधील काही जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर २ मार्च रोजी मतमोजणीची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केला आहे.

असे आहे निवडणुकीचे नवीन वेळापत्रक

आयोगाने यासंदर्भात परिपत्रक काढून घोषणा केली आहे. या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाईल. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असेल. ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २ मार्च रोजी इतर राज्यांतील पोटनिवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या दोन मतदारसंघांमध्येही मतमोजणी करण्यात येईल. आयोगाच्या पत्रकानुसार ४ मार्चपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!