नाशिक (प्रतिनिधी) :– गेल्या अनेक वर्षांपासूनचा काझी गढीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात आता मनपा आयुक्तांनी निर्वाळा दिला आहे. काझी गढीची भिंत राज्य शासनाच्या सार्वजनिक विभागामार्फत बांधण्यात येणार असून त्यामुळे काझी गढीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठी काझी गढी हा महत्वाचा भाग वसलेला आहे. येथे अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र दरवर्षीं येथील काझी गढीचा नदी काठावरील भाग ढासळतो. त्यामुळे अनेकदा मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे. 1990 च्या दरम्यान गढीचा काही भाग कोसळल्यानंतर यात दोघांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने ट्रॅक्टर हाऊस जवळ गाडगे महाराज वसाहत उभारून संबंधितांना जागा दिल्या होत्या. मात्र पुन्हा वेगवेगळे नागरिक येऊन या ठिकाणी वसाहत उभी केली.
नाशिक महापालिकेने यापुढे जाऊन काझी गढी येथील नागरिकांना केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण योजनेत घरकुले देण्याचे प्रयत्न केले. मात्र अंबड येथील चुंचाळेजवळ हि घरे असल्याने इतक्या लांब जाण्यास नागरिक तयार नव्हते. दरम्यान गोदावरीला त्यानंतर अनेक महापुरांनी वेढा घातला. त्यामध्ये काझी गढी पुन्हा एकदा चर्चेत आली. आजही काझी गढीच्या शेवटच्या टोकावर नागरिकांची घरे पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. मात्र अद्यापही हा तिढा सुटलेला नाही. दरम्यान याबाबत नुकतेच मनपा आयुक्त रमेश पवार यांनी काझी गढीबाबत महत्वाचे विधान केले कि, काझी गढीची संरक्षक भिंत हि महापालिका नाही तर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. शासन स्तरावर बैठक झाली असून खाजगी जागेत महापालिकेला बांधकाम करता येत नसल्याने राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या गढीला संरक्षक भिंत बांधेल असा निर्णय घेण्यात आला आहे.