शेअर बाजारातील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई :– शेअर बाजारातील बादशाह असलेले राकेश झुनझुनवाला (वय 62) यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या अकासा एअर या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. त्यावेळी अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार वर्गामध्ये ते लोकप्रिय होते. राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. जुलै 2022 अखेरीस त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी होते.

झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!