नाशिक :– चुलत्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नोंद घेऊन त्यानंतर नोंद मंजूर करून देण्याकरिता 3 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोतवालास रंगेहाथ पकडले आहे.
लक्ष्मण फकिरा वैराळ असे लाच घेणाऱ्या कोतवालाचे नाव आहे. वैराळ याची नेमणूक निफाड तालुक्यातील सजा भरवस येथे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे खातेवाटप आदेश निफाड कार्यालयाकडून प्राप्त झाले होते.

या आदेशाप्रमाणे 7/12 उताऱ्यावर नोंद घेऊन त्यानंतर नोंद मंजूर करून देण्याकरिता मदत करण्यासाठी वैराळ याने तक्रारदारकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
आज तलाठी कार्यालयात त्यापैकी 3 हजार रुपयांची लाच घेताना वैराळ याला रंगेहाथ पकडण्यात आले.