नाशिकरोड (प्रतिनिधी):- युक्रेनवर रशियाने हल्ला करून आठवडा होत आला आहे. दिवस जात आहेत तस तसे परिस्थिती सर्व जगासाठीच चिंताजनक होत आहे.

युक्रेनमधील भारतीयांची आणि भारतातील त्यांच्या कुटुंबियांची चिंताही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच नाशिकचे उपायुक्त विजय खरात यांचे चिंरजीव क्षितीज सुखरूप घरी येताच त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडत परमेश्वराचे मनोमन आभार मानले.
क्षितीज हा युध्दग्रस्त युक्रेनमधील टेर्नोपिल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 2019 साली गेला होता. सध्या तो पदवीच्या तिस-या वर्षाचे शिक्षण घेत आहे. मात्र, रशियाने नुकताच युक्रेनवर हल्ला केल्याने तेथील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसेंदिवस रशियाचे हल्ले तीव्र होत आहेत. परिस्थिती चिघळल्याने भारत सरकारने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. क्षितीज खरात युक्रेनवरून विशेष विमानाने भारतात येण्यास निघाला. तो काल (ता.2) रात्री नाशिकमध्ये पोहोचला. त्याचे नाशिककरांनी उत्सफूर्त स्वागत केले.
कोव्हिड परिस्थितीमुळे क्षितीज युक्रेनहून नाशिकला परतला होता. कोव्हिडचे संकट कमी होताच तो काही दिवसांपूर्वीच युक्रेनला रवाना झाला होता. मात्र, काही दिवसांनी तेथे युध्द सुरु झाले. भारतातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याची चिंता लागली होती. तेथे भारतीयांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. राहण्यास छत राहिलेले नाही. कधी बॉम्ब पडून कपाळमोक्ष होईल याची शाश्वती नसते. कर्नाटकचा विद्यार्थी युक्रेनमध्ये रशियन विमानांच्या बाम्ब हल्ल्यात ठार झाल्यानंतर क्षितीजचे वडिल विजय खरात, आई शितल, बहिण मधुरा चिंतीत झाले होते. पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांच्यासह पोलिस खात्यातील सहकारी, कुटुंबाचे हितचिंतक यांनी खरात कुटुंबियांना धीर दिला.
भारत सरकारने युक्रेनमध्ये विशेष विमान पाठवून विद्यार्थ्यांना परत आणण्याची मोहिम हाती घेतली. त्यात सुदैवाने क्षितीजचा क्रमांक लागला. तो अन्य भारतीय विद्यार्थ्यांसह विमानाने मुंबईत येत असल्याचा निरोप आल्यावर क्षितीजचे मामा राजेश सोनवणे, आजे मामा रमेश वाघरे, कुटुंबाचे हितचिंतक योगेश बनसोडे हे क्षितीजला आणण्यासाठी काल मुंबईला रवाना झाले. क्षितीजला घेऊन ते रात्री नाशिकला पोहचताच आई-वडिल, बहिणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. पोलिस आयुक्त दिपक पांडेय व अधिकारी यांनी क्षितीज ची विचारपूस केली.