येवला (दीपक सोनवणे):- कोंबड्या चोरून विकल्याच्या संशयावरून हॉटेल मालकाने त्याच्या हॉटेलमधील मजुराचा मारहाण करून खून केल्याची घटना तालुक्यातील भारम येथे घडली आहे.

बाळू गणपत नळे (वय 49,रा. डोंगरगाव ता. येवला) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत येवला तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भारम येथे संशयित हॉटेल मालक शेख जमीर मेहबूब याचे बेस्ट नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी बाळू गणपत नळे हे मजूर म्हणून काम करत होते.

3 जुलै रोजी हॉटेलचा मालक शेख जमीर याने हॉटेलमधील कर्मचारी असलेल्या बाळू नळे यांच्यावर कोंबड्या चोरून विक्री केल्याचा आरोप करत जबर मारहाण केली. त्याने लाथाबुक्यांसह हाताच्या ठोश्याने नळे यांच्यावर छातीवर, पोटावर, पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत नळे यांच्या छातीत रक्त साकळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी मुलगा अर्जुन बाळू नळे याच्या फिर्यादीवरून शेख जमीर महेबूब याच्याविरूद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यु. एन. राजपूत करत आहेत.