एरवी आरोप-प्रत्यारोपांनी गाजणाऱ्या विधानसभा सभागृहात आज मात्र हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय. आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून आज विधानसभेत खुमासदार चर्चा रंगली आदित्य यांच्या लग्नाचा खर्च सरकार उचलायला तयार आहे, अशी कोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आमदार बच्चू कडू यांनी कामगारांच्या लग्नावरुन प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आदित्यजींकडे बघून प्रश्न विचारला का, अशी मिश्किल टिपणी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. इतकंच नाही तर सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणताच, सभागृहात बाकं वाजू लागली.
देवेंद्र फडणवीस यांच्या टिप्पणीनंतर आदित्य ठाकरे यांनीही मिश्किल टिप्पणी केली. “ही काही राजकीय धमकी आहे का, आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा वगैरे.” यावर मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही चिमटा घेतला. राहुल नार्वेकर म्हणाले की, “आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं.”
यावर मग फडणवीसांनी पुढचा टोला लगावला. ते म्हणाले की, “कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न, अनुभवातून बोलतोय.” यावेळी विधानसभा सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.