नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील उपनगर एअर फोर्स वसाहती जवळ लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे एक बिबट्या रेस्क्यू करून पकडण्यात आला.
उपनगर एअर फोर्स वसाहतीत जवळपास दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. त्या मुळे एअर फोर्स वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथे राहणाऱ्या महिला, मुले हे घराबाहेर जात नव्हते. तेथील अधिकारी यांनी याबाबत वन विभागाकडे पिंजरा लावण्या बाबत सांगितले होते. वन अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता लष्कराची जागा असलेल्या भागा भोवती लष्कराच्या विभागाने मोठमोठ्या संरक्षक भिंती बांधल्यामुळे पूर्वीपासून वन्यजीवांचा वापर असलेल्या या भागातुन बाहेर जाण्यासाठी त्यांना जागा नव्हती. वन विभागाने शनिवार दि.१२ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पिंजरा लावला.
आज सकाळी पिंजराच्या दिशेने डरकाळीचा आवाज येत असल्याने लष्करातील व एअरफोर्स मधील अधिकाऱ्याने तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील यांनी बिबट्याला रेस्क्यू केले. हा नर जातीचा बिबट्या साधारण 4-5 वर्षांचा असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला आज रात्री अधिवासात सोडणार असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
31 जानेवारी 2022 रोजी एअर फोर्स पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जय भवानी रोड वरील रहिवासी परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. 8 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात आले होते.