नाशिक (प्रतिनिधी) :– सातपूर औद्योगिक वसाहतीत काल रात्री बिबट्या दिसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या सोनपरी भगर मिलच्या परिसरात काल रात्री दीड वाजेच्या सुमारास तेथील काही कर्मचार्यांना त्या परिसरात कुत्रे जोरजाराने भुंकत असल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर डोकावले.
तेव्हा शेजारील नीलकमल मार्बल या कंपनीच्या आवारातून बिबट्याने सोनपरी भगर मिलच्या आवारात प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले.
सोनपरी भगर मिलचे संचालक महेंद्र छोरिया यांनी त्वरित याबाबत पोलीस व वनविभागास बिबट्याबाबत माहिती कळविली.
वनविभागाचे पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल होत त्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला. आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ज्योती स्ट्रक्चर या कंपनीच्या आवारात बिबट्या दिसल्याचे काही लोकांनी सांगितले. मात्र तो बिबट्या अद्यापही वनविभागाच्या कर्मचार्यांना सापडलेला नसून त्याचा कसून शोध सुरू आहे.
बिबट्या आल्याचे लवकरच लक्षात आल्याने छोरिया यांच्या भगर मिलच्या गेटवर असलेले सिक्युरिटी गार्ड वेळीच सावधान झाल्याने पुढील अनर्थ टळला. दोन दिवसांपूर्वी सिटी सेंटर मॉल जवळ बिबट्याचे दर्शन झाले होते. तेव्हापासून वनविभाग त्या बिबट्याचा शोध घेत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा