नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शहरातील जुने सीबीएस (Old cbs) परिसरात बस स्थानकातून निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली गायकवाड असे या विद्यार्थिनीचे नाव असून रस्ता ओलांडताना तिचा बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास नाशिकहून नंदुरबारकडे (nashik nandurbar bus) जाणारी एमएच १५ बीएल ३४४५ ही बस जुन्या सीबीएसवरून निघाली होती. याच वेळी वैशाली गायकवाड ही विद्यार्थिनी रस्ता ओलांडत होती. यादरम्यान ती चाकाखाली आल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. यावेळी जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात (Civil hospital) दाखल करण्यात आले. परंतु तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा असूनही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.