नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : पंचवटीत विठ्ठलवाडी, खैरे मळा भागातील भूमी अपार्टमेंटसमोर डीजेच्या तालावर नाचत कोयत्याने केक कापला जात असल्याचे समजताच पोलिसांनी त्वरित धाव घेऊन वाढदिवस साजरा होत असलेल्या विधिसंघर्षित बालकासह तिघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी, की विठ्ठलवाडी परिसरात काही युवक डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत असल्याची माहिती शहर नियंत्रण कक्षास मिळाली. त्यांनी पंचवटी पोलिसांना माहिती दिली. तसेच पंचवटी पोलिसांच्या सीआर मोबाईलवरील अंमलदाराने घटनास्थळी धाव घेतली असता काही युवक डीजेच्या तालावर नाचत होते. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे दिसून आले. त्यामुळे या पथकाने गुन्हे शोध पथकाची मदत बोलावून कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणारा विधिसंघर्षित बालक व त्याचे साथीदार रवींद्र मनोहर शिरसाठ, प्रशांत चरणदास राठोड, डीजे ऑपरेटर गौरव अरुण नारायणे यांना डीजेसह ताब्यात घेतले, तर डीजेचे मालक आकाश सुरेश वाघ व अन्य तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांसह अन्य चौघांविरुद्ध भा. दं. वि. कलम 188, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 (एन) 36 (ई), तसेच 131 व 34 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी युवकांना व नागरिकांना आवाहन केले आहे, की कोणीही सार्वजनिक ठिकाणी धारदार कोयता किंवा इतर शस्त्राने केक कापणे वा सार्वजनिक ठिकाणी इतर नागरिकांना उपद्रव होईल, असे वर्तन करून वाढदिवस साजरे करू नयेत; अन्यथा असे वाढदिवस साजरे करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.