नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : समोरुन भरधाव आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस उड्डाण पुलाखालील पिलरला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी तपोवन कॉर्नर येथे घडला. या अपघातात भास्कर साहेबराव ठाकूर (वय 49, रा. दीपालीनगर, नाशिक), ज्योत्स्ना श्रीनिवास सूर्यवंशी (वय 45, रा. एन.डी. पटेलरोड, नाशिक) व इतर दोघे जण जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी नाशिकहून औरंगाबादकडे शिवशाही बस जात होती. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. दरम्यान ही बस मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाखाली 14 नंबरच्या खांबावर जाऊन आदळली. या अपघातामुळे बसमधील प्रवासी एकमेकांवर जाऊन आदळले.

दरम्यान या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तर जखमींनाजवळच्या खासगी व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृत दुचाकीस्वाराबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे