नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : कधी सुरांची पखरण तर कधी रंग रेषा तून कॅनव्हासवर सप्तरंगांची उधळण त्यातून अजरामर झालेले सूर नाशिकच्या गायिकांच्या सुरवटीत उमटले. नाशिकच्या कलाकारांनी रंग रेषा, सूर तालातून गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिनव रंगसुरांजली वाहिली.

काल नाशिक येथील रामकुंडावर नुकतेच लता मंगेशकरांचे अस्थी विसर्जन झाले. तसेह काल संध्याकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भारतरत्न लता मंगेशकर कॅनव्हासवर रंगकुंचल्यातून अवतरल्या. दीदींच्या गाण्यांवर आधारित संगीतमय कार्यक्रमात लतादीदींना नाशिककरांनी परत जवळून अनुभवले ’मेरी आवाज ही पेहेचान है या कार्यक्रमातून लतादीदींना भावपूर्ण चित्र स्वरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात स्वरसंगीत व चित्र प्रात्यक्षिकाचा अनोखे सुवर्णसंगम उपस्थितांनी अनुभवला. अशा प्रकारे लतादीदींना देशातील ही पहिली अभिनव श्रद्धांजली ठरली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांनी आपल्या रंग-कुंचल्यातून दीदींना मूर्तीमंत रुपात साकारले. ऍक्रेलिक रंग माध्यमात कॅनव्हासवर वास्तववादी चित्रशैलीतून रंगमंचावर लतादीदींचे मास्टर स्ट्रोक्स मधून साकारलेले पोट्रेट उपस्थितांचे मने जिंकून गेली. सर्वप्रथम कॅनव्हासवर मोजक्या रेषा मधून लतादीदी साकारायला सुरुवात झाली त्यानंतर चित्रकार राजेश सावंत यांनी दीदींच्या गायकी मधील असलेला अमूर्त गोडवा, अध्यात्मिक बैठक, शास्त्रीय संगीताचा खोल अभ्यास व त्यांचे महान व्यक्तिमत्व उभारण्यासाठी चित्राच्या पार्श्वभूमीवर अमूर्त आकारांचा अत्यंत मार्मिक संयोजन करत गाणं सरस्वतीला चित्रकार राजेश सावंत यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रंगछटा मधून साकारले.
तसेच दीदींच्या चेहर्यावर वयाच्या अंतिम क्षणापर्यंत रुजलेले त्यांचे निरागस स्मितहास्य कुंचल्यातून साकारत गेले. साथीला येथील 25 गायिकांनी लतादीदींच्या अजरामर स्वरकलाकृती आपल्या सूरातून जीवंत केल्या. एकीकडे चित्रकर्मी सावंत यांच्या कॅनव्हासवर लतादीदी अवतरत होत्या तर दुसरीकडे मंचावर दीदींनी गायलेली बहारदार अविस्मरणीय गाणी साकारत गेली. तर लतादीदीसाठी चित्रसूरांजली वाहणारा ‘मेरी आवाज ही पेहचान है’ संगीतचित्रमय कार्यक्रमाच्या समारोपाला दीदीच पूर्ण झालेलं व्यक्ती चित्र एका वेगळ्या उंचीला घेऊन गेले. या कार्यक्रमाचे आयोजन बाबाज थिएटरर्सचे प्रशांत जुन्नरे यांनी केले तर अमोल पाळेकर यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले.