Home क्राईम पंचवटीतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

पंचवटीतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : परिसरात नागरिकांना मारहाण करून लूटमार व दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळित करणार्‍या पंचवटीतील सराईत गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यान्वये पुन्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

रोहित खंडू गांगुर्डे (वय 21, रा. मुंजे बाबा गल्ली, पेठ रोड, पंचवटी) असे संशयित गुंडाचे नाव आहे. त्याने पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठ रोड, पंचवटी, दिंडोरी रोड, फुलेनगर, शरदचंद्र पवार भाजीपाला मार्केट, रामकुंड परिसर, निमाणी बस स्थानक आणि परिसरातील नागरिकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून लूटमार केली होती. यामुळे नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जनजीवन विस्कळित करणार्‍या गांगुर्डे याला पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये गांगुर्डे याला नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, खंडणी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन दंगा करणे, खून करणे, बलाद ग्रहण करणे, जबरी चोरी करताना दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकारचे कृत्य करणार्‍या व्यक्तीवर एम. पी. डी. ए. कायद्यातील तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंध करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.