नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : देशात एकीकडे व्हॅलेंटाईन वीक (valentine week) सुरु असतांना नाशिक (nashik ) जिल्ह्यातील देवळा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोहोणेर येथील एका तरुणाला प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणात आज सकाळी साडे अकराच्या सुमारास तरुणीने या युवकास जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील गोरख काशिनाथ बच्छाव (वय ३१) याचे एका मुलीशी तीन वर्षांपासून ओळख होती. या प्रकरणात एकतर्फी प्रेमाची शक्यता वर्तवली जात आहे. युवक या मुलीचे लग्न मोडत होता. या रागातून मुलीचे आईवडील, दोन भाऊ व सदर मुलगी यांनी आज दुपारी लोहोणेर ग्रामपंचायत समोर गोरख बच्छाव यास मारहाण केली. त्यात संताप अनावर झाल्याने मुलीने ज्वालाग्राही इंधन फेकत सदर मुलास जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो पन्नास टक्के भाजला असून त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह देवळा तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी पंचनामा करत या प्रकरणात मुलीसह पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे.