नाशिकरोड । भ्रमर वृत्तसेवा : वडाळा गावातील युवकाने नाशिकरोड येथील सावरकर उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता उपचारादरम्यान त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडा कॉलनी, वडाळा गाव येथील विक्की संजय इंगळे (वय 21) याने सावरकर उड्डाणपुलावरून बिटको चौक या ठिकाणी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या डोक्याला, छातीला, दोन्ही हातांना व पायाला गंभीर इजा झाली व रक्तस्राव झाला.
दरम्यान नागरिकांनी त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना तो मयत झाल्याचे डॉ. आर. बी. पाटील यांनी तपासून घोषित केले. तसेच याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.